अकरावीच्या सीईटीसाठी 12 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

राज्यात अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी 12 लाख  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार  नसल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

राज्य शासनाने यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य मंडळामार्फत 21 ऑगस्टला राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा  घेण्याचे नियोजन आहे. राज्य मंडळाने सीईटीच्या नोंदणीसाठी 20 जुलैपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली.

मात्र संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने  अर्ज प्रक्रिया 21 जुलैपासून काही दिवसांसाठी बंद ठेवून पुन्हा सुरू करण्यात आली. अर्ज भरण्यासाठीची मुदत 3 ऑगस्टला संपली.

राज्य मंडळातर्फे  होणाऱ्या 11 वीच्या सीईटीसाठी 11 लाख 99 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्याची नोंद  संगणकीय प्रणालीत होणे बाकी आहे. त्यामुळे राज्यभरातून सुमारे 12 लाख विद्यार्थी ही सीईटी देतील असा अंदाज आहे.

सीईटीच्या नोंदणीसाठी अर्ज करायला  मुदतवाढ देण्याबाबत मागणी आलेली नसल्याने आता नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *