किरकोळ बाजारात भाज्या महाग

पावसाचे कारण देत विक्रेत्यांकडून भाववाढ

ठाणे : घाऊक बाजारात भाज्यांचे दर स्थिर असले तरी किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पावसामुळे भाज्यांची मोठी नासाडी होत आहे हे कारण पुढे करत किरकोळ बाजारात भेंडी, पडवळ, गवार, घेवडा, फरसबी या भाज्या ८० ते १०० रुपये प्रति किलोने विकल्या जात आहेत. वाशी तसेच कल्याण बाजार समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या घाऊक बाजारात या भाज्यांचे दर निम्मे आहेत. पाउस, पूर, इंधनाचे वाढलेले दर अशी कारणे पुढे करत ठाणे जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच शहरांमध्ये चढय़ा दराने भाज्यांची विक्री केली जात असल्याने ग्राहकांची मोठी लूट सुरू आहे.

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, नाशिकहून मोठय़ा प्रमाणात तर काही प्रमाणात कोल्हापूरहून भाज्यांची आवक होत असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्य़ात पूरस्थिती निर्माण झाल्याने या ठिकाणाहून येणाऱ्या भाज्यांची आवक घटलेली पाहायला मिळाली. असे असले तरी राज्याच्या इतर जिल्ह्य़ांतून तसेच कर्नाटक, गुजरात यांसारख्या राज्यांमधून पुरेशा प्रमाणात भाज्यांची आवक होत आहे. वाशी येथील भाज्यांच्या घाऊक बाजारपेठेत सोमवारी ७१३ गाडय़ा दाखल झाल्या. इतक्या मोठय़ा प्रमाणावर भाज्यांची आवक होत असल्याने घाऊक बाजारात सर्वच भाज्यांचे दर स्थिर आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली.  किरकोळ बाजारात मात्र नेमके उलट चित्र दिसत आहे. घाऊक बाजारात ३८ रुपये प्रति किलोने विकली जाणारी भेंडी किरकोळीत ८० रुपये किलो या दराने विकली जात आहे. घाऊक बाजारात ५० रुपये प्रति किलोने विकली जाणारी गवार किरकोळ बाजारात ८० रुपये किलोने विकली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *