जेवणाच्या वादातून तरुणाचा खून

नाशिक यथील स्टेट बँकेजवळील सोनाली मटण-भाकरी हॉटेलमध्ये जेवण करीत असताना किरकोळ वादातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाच्या डोक्यात फरशा, दगड व खुर्ची घालत त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत तपास चक्रे फिरवून सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

याबाबत अंबड पोलिस ठाण्यात अंकुश वसंत पगारे (वय २५, रा. द्वारका हाइट्स, तपोवन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्टेट बँकेजवळील हॉटेल सोनाली येथे बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास जेवण करीत असताना झालेल्या बाचाबाचीतून पाच ते सहा युवकांनी प्रसाद भालेराव (वय २५, रा. उपनगर परिसर, नाशिकरोड) या युवकाला हॉटेलबाहेर काढत डोक्यात फरशी, दगड व लोखंडी खुर्चीने मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटना घडताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाल्याने पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी अनिल दशरथ पिटेकर उर्फ गिन्या (वय ३२), नीलेश दांडेकर या दोघांसह चार संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *