नऊ लाख… नऊ तास अन् एसटीच्या टपावर

२३ जुलै रोजी चिपळूणसहीत संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पडला. विशेष म्हणजे चिपळूणला या पावसाचा सर्वात मोठा फटका बसला. चिपळूणला पुराचा वेढा पडल्यानंतर त्यातून एसटीचे आगाराही सुटू शकले नाही. पाणी वाढण्याचा धोका पाहता अनेक गाड्या अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे, आगारातील सामान सुरक्षित स्थळी हलवणे इत्यादी कामे पार पाडताना पाण्याची पातळी बघता बघता वाढली आणि एसटीच्या सात कर्मचाऱ्यांना जीव वाचविण्यासाठी एसटीच्या टपावर नऊ तास काढावे लागले.  नऊ तासांनी  त्यांची पोलिसांनी सुटका केली. या पुरात चिपळूण आगाराचेही मोठे नुकसान झाले. मात्र आगारामधील व्यवस्थापकाच्या प्रसंगावधामुळे राज्य परिवहन महामंडळाचं ९ लाख रुपयांचं नुकसान होण्यापासून वाचलं.

एसटीचे नऊ लाख रुपये वाचवण्यामध्ये आगाराचे व्यवस्थापक रणजित राजेशर्के आणि सात कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका निभावली. हे सात जण आगारामध्ये पाणी भरलं तेव्हा एसटीच्या टपावर नऊ तास एकाच जागी बसून होते. आगारात पाणी भरत असल्याची माहिती आगाराच्या सुरक्षा रक्षकांनी पहाटेच्या सुमारास शिर्के यांना फोनवरुन दिली आणि त्यांनी तात्काळ गुरुवारी पहाटे पावणेचार वाजता आगार गाठले.

बघता-बघता पाण्याची पातळी १२ ते १४ फुटांपर्यंत वाढली आणि आम्हाला धडकी भरली. आगारातील सामानाही डोळ्यादेखल वाहून जाताना वाईट वाटले. १५ संगणक वाहून गेले. यात २१ एसटी गाड्यांच्या टपापर्यंत पाणी येऊ लागले. त्यामुळे वर्कशॉपमधील टायर, तसेच गाड्यांच्या वरच्या बाजूला आणि मागील बाजूला असलेले टायरही वाहून गेल्याचे राजेशर्के यांनी सांगितले. माझा मोबाइलही आगाराबाहेर पडलेल्या एका कर्मचाऱ्याकडे राहिला. तर सोबत असलेल्या सहा कर्मचाऱ्यांपैकी एक दोघांचेच फोन लागत होते. त्यामुळे यंत्रणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. तर दुसरीकडे प्रचंड पाऊस आणि वाढलेली पाण्याची पातळी पाहून धडकी भरत होती. अखेर बरेच प्रयत्न केल्यानंतर राजेशर्के यांचा रत्नागिरी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क झाला. त्यांच्याशी संपर्क साधूून त्यांना सगळी माहिती दिली. त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलीस बोटीच्या सहाय्याने पोहोचल्यानंतर त्यांनी दुपारी अडीचच्या सुमारास सुटका केली. एसटी महामंडळाची ९ लाखांची रोकड वाचवल्याचं समाधान असलं तरी या पुरामुळे आगाराचे मोठे नुकसान झाल्याची खंत राजेशर्के यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *