मालेगाव शहरात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांकडून तोडफोड

शहरातील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि.१९) घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिला दगावल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला होता.

तालुक्यातील रावळगाव येथील सविता अजय खरे (वय २०) या गर्भवती महिलेला रविवारी (दि.१८) शहरातील सटाणा रोडवरील ममता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर या महिलेचे सोमवारी (दि.१९) सकाळी निधन झाले. या घटनेची माहिती मृत महिलेच्या नातेवाइकांना कळताच त्यांनी रुग्णालयात तोडफोड केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सविताचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने किल्ला व छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृत महिलेच्या नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *