कृषी विद्यापीठाच्या शुल्कात सवलत

करोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या अधिनस्थ शासकीय व अशासकीय सर्व महाविद्यालयांचे सर्व पदवी, पदव्युत्तर व आचार्य या अभ्यासक्रमाचे विविध शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश कृषीमंत्र्यांनी या वेळी दिले. अनुदानित महाविद्यालये व कृषी विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील विद्यार्थी मदत निधी, विद्यार्थी सुरक्षा विमा शुल्क, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुल्क, महाविद्यालय नियतकालिक, अश्वमेध किं वा क्रीडा महोत्सव शुल्क, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शुल्क, ओळखपत्र, विद्यार्थी सहायता – मदत – कल्याण निधी, स्नेहसंमेलन, गुणपत्रिका शुल्क, नोंदणी शुल्क, अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आलेला नाही. त्यामुळे या शुल्कात १०० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर जिमखाना, खेळ व इतर उपक्रम आणि ग्रंथालय शुल्कामध्ये ५० टक्के सूट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकरण्यात येणाऱ्या शुल्कात पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनी आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्कात ५० टक्के सूट देण्यात यावी. विद्यार्थ्यांकडे मागील सत्रामध्ये प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ हप्त्यांत भरण्याची सवलत देण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

१८९ महाविद्यालयांतील ४५ हजार विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ होणार असून ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, पालक यांचा करोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्कात सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *