कोकणात बहुतांश भागात दमदार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी गेल्या २४ तासांत २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसरासह रत्नागिरीत जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरलाही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ातील परभणी येथे गेल्या २४ तासांत या भागातील आजवरचा सर्वाधिक २३२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झाले असून, पाच हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही भागांत मंगळवारीही जोरदार पाऊस होणार असून, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आदी भागांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात आणि त्यालगतच्या भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. काही भागांत संततधार सुरू आहे. मुंबई आणि परिसरातही सोमवारी पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस होत आहे. रत्नागिरीत सोमवारी दिवसभरात संध्याकाळी पाचपर्यंत १०२ मिलिमीटर पाऊस झाला. या कालावधीत मुंबईत ४७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरसह कोल्हापूर, सातारा आदी भागांत पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ात परभणी आणि विदर्भातील अमरावती, वर्धासह काही ठिकाणी पाऊस झाला.
बंगालच्या उपसागरातून सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव पश्चिम-उत्तर भागातील राज्यांपर्यंत आहे. त्यामुळे २३ दिवसांपासून दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांत थांबलेला मोसमी पावसाचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. या क्षेत्राचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाडय़ात काही भागांत पाऊस होतो आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे.
