विदर्भात संततधार

उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात बुधवारी रात्रीपासून सुमारे दोन आठवडय़ानंतर पावसाचे आगमन झाले. कोरपना तालुक्यातील खिर्डी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अंमलनाला तलावात विजेच्या धक्क्याने २५ गायींचा मृत्यू झाला. गडचिरोलीतील गोंविदपूर नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने चामोर्शी व गडचिरोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. संततधार पावसामुळे चिंचडोह धरणाचे ३८ दरवाजे उघडण्यात आले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मात्र नागपूरसह विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वाशीम, बुलढाणा, गोंदिया, भंडारा आदी शहरांमध्ये होता. वर्धा व यवतमाळ जिल्ह्य़ात बुधवारी रात्री तो चांगलाच कोसळला. यवतमाळ जिल्ह्य़ात दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर वणी तालुक्यात २६ बकऱ्या आणि बैलजोडी वीजप्रवाहाने मृत्युमुखी पडले. गुरुवारी या पावसाने उपराजधानीत रौद्र रुप धारण के ले. सुमारे ८२ वस्त्यांना पावसाचा फटका बसला तर कळमेश्वर-गोवरी रस्त्यावरील नाल्यात दोघे वाहून गेले. दरम्यान, या पावसाने शेतकरी सुखावला आहे.

जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असली तरीही यावर्षी फारसा पाऊस झाला नाही. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या, पण पावसाळ्यातील पावसाची प्रतीक्षा कायम होती. सलग दोन आठवडे पावसाने पाठ फिरवल्याने वातावरणातील उकाडा वाढला. तर विदर्भातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

कळमेश्वर-गोवरी रस्त्यावरील नाल्यात दोघे वाहून गेले

नागपूर : कळमेश्वर-गोवरी मार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुलाच्या उंचीच्या मागणीसाठी आंदोलने झाली. परंतु कळमेश्वर नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज अण्णाजी निंबाळकर (५२) आणि मधुकर शिंदे (४०) रा. गोवरी हे दुचाकीसह नाल्याच्या पुरात वाहून गेले. या नाल्यावरील हे पहिले दोन बळी ठरले.

हे दोघे कळमेश्वरला येण्यासाठी दुचाकीने नाल्याच्या पुलावरून जात असताना नाल्याला अचानक पूर आल्याने ते वाहून गेले. राज्य आपत्ती निवारण पथकाकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. पोलिसांनी काही अंतरापर्यंत वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेतला, मात्र ते मिळाले नाहीत.

नगर परिषद मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी लोकांनी त्यांना घेराव केला असता त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या नाल्याच्या  पुलाच्या उंचीसाठी अनेक वर्षांपासून वृत्तपत्रातून मागणी करण्यात आली, परंतु याकडे शासन आणि नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यांच्या दुर्लक्षतेमुळे आज हे दोघे बळी ठरले.

हा नाला कळमेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत येतो हे विशेष.

गोंविदपूर नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने चामोर्शी-गडचिरोली मार्ग बंद

चंद्रपूर/गडचिरोली : जिल्हय़ात गुरुवारी पहाटेपासूनच सर्वदूर संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरपना तालुक्यातील खिर्डी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अंमलनाला तलावात विजेच्या धक्क्याने २५ गायींचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील गोंविदपूर नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने चामोर्शी व गडचिरोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. संततधार पावसामुळे चिंचडोह धरणाचे ३८ दरवाजे उघडण्यात आले आहे.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ात मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. जिल्हय़ात बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. त्यामुळे कापूस, सोयाबीन, धानपिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. खिर्डी शेतशिवारात वीज कोसळून लक्कडकोट येथील वारलू रामटेके (४४) मृत्यू झाला. दरम्यान, अंमलनाला तलाव परिसरात चरण्यासाठी आलेल्या २५ गायींना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर, गडचिरोलीतील गोंविदपूर येथील नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने चामोर्शी ते गडचिरोली हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या मार्गावरील वाहतूक कुनघाडा, पोटेगाव मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्हय़ात सर्वदूर पाऊस झाल्याने चिंचडोह धरणाचे ३८ दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *