संभाव्य तिसरी लाट तसेच करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा धोका निर्माण झाल्याने काही दिवसांपूर्वी ठाणे शहरातील दुकाने सायंकाळी चारनंतर बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. असे असतानाही व्यापाऱ्यांकडून या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. शहरातील जांभळीनाका बाजारपेठ, गोखले रोड, कोपरी, घोडबंदर भागांतील दुकाने सायंकाळ चार नंतरही छुप्या पद्धतीने खुली ठेवली जात आहेत. पोलीस तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही याकडे कानाडोळा केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून संभाव्य तिसरी लाट आणि करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा धोका निर्माण झाल्याने जिल्ह्यातील दुसऱ्या स्तरामध्ये असणाऱ्या ठाणे शहराचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील दुकाने, उपाहारगृहे आता सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत खुली राहतील. हे आदेश केवळ कागदोपत्री असल्याचे आता दिसून येत आहे. शहरातील जांभळीनाका, गोखले रोड, नौपाडा, घोडबंदर परिसर, कोपरी, वागळे इस्टेट या भागांतील कपडे, भांडी, खाद्यपदार्थ विक्रीचे दुकानमालक सायंकाळी चार नंतरही दुकानांचे दार अर्धवट खुले ठेवून वस्तूंची विक्री करताना दिसत आहेत. यापूर्वी प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांमध्ये पोलीस तसेच महापालिका कर्मचाऱ्यांकडून गस्ती घातली जात होती. निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना केले जात होते. आता पोलिसांकडून अनेक ठिकाणी कारवाई तसेच गस्तीही घातली जात नाही. दुकानदारांविरोधात कारवाई करण्याचे काम आमचे नसल्याचे ठाणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. तर छुप्या पद्धतीने दुकाने खुली राहिल्यास कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांना महापालिका किंवा पोलिसांकडून ‘त्रास’ही दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुकाने पूर्णपणे खुली ठेवली जावी, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
