करोनामुळे निराधार झालेल्या विशेषत: त्या कुटुंबातील विधवा महिलांसाठीचे समाज माध्यम जाळे तयार झाले आहे. राज्यभरातील सुमारे दोनशे स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते या माध्यमातून जोडले गेले आहे .
करोनाने ज्या कुटुंबात मृत्यू झाले त्या निराधार कुटुंबांसाठी सरकारने काहीतरी करायला हवे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मागील काही दिवसात समाज माध्यमातपोस्ट लिहिल्या. राज्यात २१ ते ५० या वयोगटात एकूण १९ हजार ९०३ मृत्यू झाले आहेत. या संदर्भात त्यांनी लेख लिहिला. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यानंतर या विषयावर महाराष्ट्रातील ज्या संस्थांना व कार्यकर्त्यांना काम करावेसे वाटते त्यांनी संपर्क करावा असे आवाहन केले. अवघ्या चार दिवसांत १९० संस्था व व्यक्तींनी या बाबत श्री. कुलकर्णी यांचेशी संपर्क केला. आम्हाला या विषयात काम करावेसे वाटते असे कळविले. महाराष्ट्राच्या एकूण २५ जिल्ह्यंतील या संस्था व लोक आहेत. रायगड ते गडचिरोली हिंगोलीपर्यंत लोक जोडले गेले. नंतर या सर्व व्यक्ती व संस्थांचा एक व्हॉट्स अॅप गट बनविण्यात आला. प्रत्येकाने आपल्या भागात कामाला सुरुवात केली.
त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाच्या राहुल मोरे व बिरासी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. राज्यातील इतक्या संस्था एकत्र आल्याबद्दल त्यांना खूपच समाधान वाटले. नंतर महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्त पवनीत कौर यांचे बरोबर संपर्क साधण्याचा आला. त्यांनी लगेचच या प्रश्नी बैठक घेण्याची तयारी दर्शविली. व त्याच दिवशी बैठक घेतली. या बाबत आणखी तपशीलवार सूचना करा. पुढील आठवडय़ात लगेच बैठक घेऊन याबाबत नक्की काम सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. थोडक्यात मुलांसाठी महिला बाल कल्याण विभागाने महत्त्वाची भूमिका घेतली. आता विधवा महिलांबाबत हा विभाग काम करतो आहे. या विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अनेक ठिकाणच्या संस्था या निमित्ताने एकत्र आल्या व कामाला सुरुवात झाली आहे, हे समाधान खूप मोठे आहे. या सदिच्छांचा गुणाकार होऊन महाराष्ट्रातील वीस हजार कुटुंबांना आधार देण्यासाठी जर काही करू शकलो, तर आमच्या सर्व संस्थांसाठी हा समाधानाचा क्षण असेल, अशी भावना श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
