‘टी सीरिज’चे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी अब्दुल रौफ मर्चंट याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम के ली. त्याच वेळी त्याचा भाऊ अब्दुल राशीद दाऊद मर्चंटची निर्दोष सुटका करण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द करत १९ वर्षांनंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निर्माते व ‘टिप्स’चे मालक रमेश तौरानी यांची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मात्र न्यायालयाने योग्य ठरवला.
राशीद याला शिक्षा सुनावताना न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने त्याला तातडीने शरण येण्याचे आदेश दिले. शिक्षेत सवलत देण्याची रौफची मागणीही न्यायालयाने या वेळी फेटाळली. खटल्यादरम्यानही रौफची गुन्हेगारी कृत्ये सुरूच होती. तसेच २००९ मध्ये फर्लो मंजूर झाल्यानंतर तो बांगलादेशला पळून गेला होता, ही बाब लक्षात घेता त्याला शिक्षेत दया दाखवणे योग्य होणार नसल्याचे न्यायालयाने त्याची विनंती फेटाळताना नमूद के ले. २०१६ मध्ये रौफला पुन्हा अटक करण्यात आली होती.
राज्य सरकारने रमेश तौरानी आणि अब्दुल राशीद या दोघांच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते. त्यावर निर्णय देताना तौरानी यांच्याबाबतचे सरकारचे अपील न्यायालयाने फेटाळले.
‘कॅसेटकिंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुलशन कुमार यांची ऑगस्ट १९९७ मध्ये अंधेरी येथील मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी कुख्यात गुंड अबू सालेम याला त्यांच्या हत्येसाठी पैसे दिल्याचा पोलिसांचा आरोप होता. २९ एप्रिल २००२ रोजी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना तौरानी आणि अब्दुल राशीद यांच्यासह १८ आरोपींची निर्दोष सुटका केली होती, तर अब्दुल रौफ याला दोषी ठरवत त्याला जन्मठेप सुनावली होती. न्यायालयाने त्याला खून, खुनाचा कट रचणे, चोरी करण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करणे आणि शस्त्र बाळगण्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाने मात्र त्याची आरोपांतून निर्दोष सुटका केली.
न्यायालयाचे निरीक्षण रौफ याचे कुमार यांच्याशी वैयक्तिक वैर नव्हते. त्याने संगीतकार नदीम सैफी आणि अबू सालेम यांच्या सांगण्यावरून कुमार यांची हत्या के ली होती. वैयक्तिक सुडातून कु मार यांची हत्या करण्यात आली. तर तौरानी यांनी नदीम व सालेमसोबत कु मार यांच्या हत्येचा कट रचल्याचा कोणताही ठोस पुरावा पोलीस सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे विशेष न्यायालयाचा त्यांच्याबाबतचा निर्णय योग्य होता. खटल्यातील प्रत्यदर्शी साक्षीदारांनी हल्ल्यानंतर कु मार आणि त्यांच्या चालकाला रुग्णालयात नेले. त्यांनी पोलिसांनाही कळवले. शिवाय न घाबरता त्यांनी आरोपींविरोधात साक्ष दिली.
