राज्यात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात शहरी भागात कोरोना आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात (lockdown in rural areas) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. राज्यात 15 जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिसून येत आहे. यात अमरावती, बुलडाणा, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, सोलापूर, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, बीड, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. त्यामुळे येथे कडक लॉकडाऊनचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान, येथे कोरोनाची लक्षणे असलेल्यांना होमक्वारंटाईन न करता विलगीकरण करा, अशा सूचना सरकारने केल्या आहेत.
राज्य सरकारच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते. अडीच तास बैठक झाली असून या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी 15 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालकांना बारकाईने सर्वेक्षण करण्यास सूचना दिली गेली आहे. तसेच जे बाधित असतील, ज्यांना लक्षणे असतील त्यांना होमक्वारंटाईन न करता विलगीकरण करा. होमक्वारंटाईनबाबत समाधानी नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.
