दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा झालेला स्फोट आणि विविध राज्यांत पुरेशा आरोग्य सुविधांअभावी रुग्णांची होत असलेली हेळसांड, यामुळे देशातील परिस्थिती बिकट बनली आहे. प्रचंड वेगानं होत असलेला प्रसार रोखण्यासाठी देशातील बहुतांश राज्यांनी लॉकडाउन आणि कडक निर्बंधांची पावलं उचलली. त्यामुळे काही प्रमाणात करोना रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र, दररोज होत असलेल्या मृत्यूंची संख्या कायम आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिवसभरातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. आकडेवारीनुसार देशातील करोना रुग्णसंख्येत घट होत असली, तरी मृत्यूंचं प्रमाण मात्र काळजी वाढवणारं आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन लाख २९ हजार ९४२ करोनाबाधित आढळून आले आहेत. मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे तीन लाख ५६ हजार ८२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
