मुखपट्टीविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून मुखपट्टीविना फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मात्र बेफिकीर मुंबईकरांना वेसण घालण्यात यंत्रणांना अपयश आले आहे. मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत ५४ कोटी १३ लाख ५९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

करोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांना मुखपट्टीचा वापर बंधनकारक आहे. मात्र काही मुंबईकर मुखपट्टीविनाच सार्वजनिक फिरताना आढळले होते. त्यामुळे अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने पथके सज्ज केली. मुखपट्टीविना फिरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. मुंबईत मुखपट्टीविना फिरणाऱ्या २६ लाख ८७ हजार ३३९ नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या नागरिकांकडून ५४ कोटी १३ लाख ५९ हजार रुपये दंडरूपात वसूल करून पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत.

मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध पालिका, पोलीस आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांना वेसण घालण्यात अपयश येत आहे. मुखपट्टीचा वापर न करता फिरणाऱ्यांमुळे अन्य नागरिकांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरताना मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून पुन्हा करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *