११ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; कारचे पेट्रोल संपल्याने मुलाची सुटका

११ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; कारचे पेट्रोल संपल्याने मुलाची सुटका

देगलूर येथील एका अकरा वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला आहे. गावातील परिचीत व्यक्तीनेच अपहरणाचा कट रचला होता; परंतु बिलोली तालुक्यातील बडूर येथे कारमधील पेट्रोल संपल्याने आणि अपह्त मुलाने सतर्कता दाखविल्याने १६ तासानंतर या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली.

साधना नगरमधील ओमकार अशोक पाटील या ११ वर्षीय मुलाचे गुरुवार दि.१५ एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले होते. वडील अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरुन देगलूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेश शेषराव बोईनवाड या गावातील परिचयाच्या व्यक्तीने ओमकारला वाढदिवसाचे गिफ्ट देतो, असे अमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. बोईनवाड हा परिचयाचा असल्याने ओमकारने त्याच्यावर विश्‍वास ठेवत सोबत जाण्यास तयार झाला. वाहन क्रमांक एम.एच.४७.वाय.७८३७ मध्ये बसवून नेत असतांना ओमकारला संशय आल्याने त्याने घरी जाण्याचा हट्ट धरला. ओमकार ऐकत नसल्याने बोईनवाडने त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत ओमकारच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. तसेच त्याच्या गुप्तांगावरही मारण्यात आले; परंतु पहाटे पाच वाजता बडूर येथे कारमधील पेट्रोल संपल्याने आरोपीने ओमकारला कारमध्येच लॉक करुन फरार झाला.

ओमकारचा ओरडण्याचा आवाज ऐकून एका पादच्यार्‍याने त्याला कारच्या बाहेर काढले आणि त्यांनीच मोबाईलवरुन ओमकारचे वडील अशोक पाटील यांना माहिती दिली. अशोक पाटील यांनी तातडीने ही माहिती पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांना दिली. धबडगे यांनी पोलिस उपनिरीक्षक सांगळे यांना सूचना दिल्यानंतर त्यांनी सहकार्‍यांसह जावून ओमकारची सुटका केली. जखमी ओमकारला प्रथम रुग्णालयात नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला घरी सोडले. अपहरणकर्ता महेश बोईनवाड हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *