पाचगावातील महिलांची हातमाग उद्योगातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

मंत्री नितीन गडकरी यांनी आदर्श गाव योजनेत दत्तक घेतलेल्या जिल्ह्यातील पाचगाव येथे सरकारी योजनांच्या मदतीने महिलांनी हातमागाच्या माध्यमातून कापड उद्योग सुरू करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू के ली आहे. या उद्योगात पन्नासहून अधिक महिलांना रोजगार मिळाला असून त्या टाकाऊ कापडापासून आकर्षक चटई, सतरंजी, गालिचे, चादरी आदी तयार करतात. त्याला बाजारात चांगली मागणी आहे.

पाचगाव  हे नागपूरपासून ३० किमी अंतरावर आहे. परिसरात अनेक  दगडखाणी आहेत. तेथे धावणाऱ्या ट्रकांमुळे उडणारी धुळ, दगडखाणीच्या कणांमुळे होणारे आजार यामुळे गावकरी त्रस्त होते. सुविधांचाही तेथे मोठ्या प्रमाणात अभाव होता. गडकरी केद्रात प्रथम मंत्री झाल्यावर त्यांनी केंद्राच्या आदर्श ग्राम योजनेसाठी पाचगावची निवड के ली. गावाचा सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक पातळीवर अभ्यास करून विविध नाविन्यपूर्ण योजना राबवणे सुरू के ले. महिला सक्षमीकरण, त्यांचा हाताला रोजगार देणे व यातून गाव समृद्ध करणे या उद्देशाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून येथे हातमाग उद्योग (क्लस्टर) सुरू करण्यात आले.  मोलमजुरी करणाऱ्या व इतरही ३०० महिलांना एकत्रित करून प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी विणकर समाजातील तज्ज्ञ तसेच सरकारी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. ४५ दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान महिलांना कापड तयार करणे, त्याला रंग देण्यासह इतरही तत्सम कामाची माहिती देण्यात आली.

बुटीबोरी व सुरत येथील मिल्समधील कापड या महिलांना नि:शुल्क उपलब्ध करून दिला जाते व त्यातून त्या सोफा कव्हर, कार सीट कव्हर, चटई, सतरंजी, गालिचे, चादरी तयार करतात. त्या ग्रामोद्योग विभागाच्यावतीने आयोजित विविध प्रदर्शनात तसेच दिल्लीतील मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. या उद्योगात काम करणाऱ्या महिलांना महिन्याकाठी १५ ते २० हजार रुपये मिळतात. सध्या पाचगावच्या या उद्योगात १५ यंत्रांवर (लुम्स)काम सुरू आहे. येत्या काही दिवसात आणखी ५० यंत्र लावण्याचे नियोजन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *