नेपाळ पोलिसांकडून गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, एक बेपत्ता

नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला उत्तर प्रदेश पोलिसांनी दुजोरा दिलाय. उत्तर प्रदेशला लागून असलेल्या भारत – नेपाळ सीमेवर भारतीय नागरिक आणि नेपाळ पोलिसांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर नेपाळ पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात गोळी लागल्यानं भारतीय नागरिक जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारा दरम्यान या भारतीय नागरिकानं अखेरचा श्वास घेतला. मृत व्यक्तीचं नाव गोविंदा असं असून तो २६ वर्षांचा होता. गोविंदा आपले मित्र पप्पू सिंह आणि गुरमीत सिंह यांच्यासोबत नेपाळमध्ये गेला होता.
पीलीभीतचे पोलीस अधीक्षक जय प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन भारतीय नागरिक नेपाळला गेले होते. काही कारणावरून नेपाळ पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. यामध्ये नेपाळ पोलिसांकडून भारतीय नागरिकावर गोळी झाडण्यात आली. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्याचा मृत्यू झाला. त्याच्या एका साथीदारानं नेपाळ पोलिसांसोबत झालेल्या झटापटीतच सीमा पार केल्यानं त्याचा जीव वाचला. तर त्यांचा तिसरा साथीदार मात्र अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *