दाऊद पाकिस्तानातच असल्याचा कागदोपत्री पुरावा

दाऊद पाकिस्तानातच असल्याचा कागदोपत्री पुरावा

भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेपूर्वी १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

मुंबई बाँबस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आमच्या देशात नसल्याचं पाकिस्तान सांगत असतानाच दाऊद पाकिस्तानातच असल्याचा कागदोपत्री पुरावा भारतीय सुरक्षा अधिका-यांच्या हातात लागला असून एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भारतीय सुरक्षा यंत्रणेला दाऊदशी संबधित काही कागदपत्रे मिळाली आहेत. ज्यावरुन दाऊद पाकिस्तानात असल्याचे सिद्ध होते. इतकेच नाही तर यंत्रणेकडे ५९ वर्षीय दाऊदचा फोटोही आहे. २०१२ मध्ये हा फोटो घेण्यात आला होता.

सुरक्षा यंत्रणेला मिळालेल्या कागदपत्रांमध्ये केवळ दाऊदच्या घरचा पत्ताच नाही तर त्याचा मोबाईल नंबरही आहे. दाऊद पाकिस्तानात नसल्याचे वारंवार पाकिस्तानकडून सांगण्यात येते. मात्र या पुराव्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

भारतीय सुरक्षा रक्षकांच्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम कराचीतल्या क्लिफ्टन या भागात पत्नी, मुलगा मोईन नवाझ व मुली माहरूख, मेहरीन व माझिया यांच्यासह राहत आहे. माहरूखचे जावेद मियाँदादचा मुलगा जुनेद याच्याशी लग्न झाल्याचे सर्वश्रुत आहे. दाऊदची पत्नी मेहजबीन हिच्या नावे असलेल्या डी-१३, ब्लॉक – ४. कराची डेव्हलपमेंट अथॉरिटी, स्कीम – ५, क्लिफ्टन या पत्त्यावरील एप्रिल २०१५ या महिन्याचे टेलिफोनचे बिल सुरक्षारक्षकांच्या हाती लागले आहे.

दाऊदकडे तीन पाकिस्तानी पासपोर्टही आहेत. यामध्ये एका पासपोर्टवर ६ ए, खायाबन तंजीम फेज 5, डिफेन्स हाउसिंग विभाग असा पत्ता देण्यात आला आहे तर दुस-या पासपोर्टवरमोइन पॅलेस, दुसरा मजला, अब्दुल्ला शाह गाजी दर्ग्याजवळ, क्लिफ्टन असा पत्ता देण्यात आला आहे. या पासपोर्टांची कॉपीही गुप्तचर विभागाकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *