अंबरनाथमध्ये पुन्हा पार्किंग घोटाळा; नागरिकांची खुली लूट

शासनाच्या भूखंडावरील पार्किंग घोटाळ्याचा पूर्वइतिहास असलेल्या अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा वाहन चालकांची अवैध लूट सुरू असल्याचा पार्किंग घोटाळा समोर आला आहे. अंबरनाथ पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंग भूखंडाचा ताबा काही माफियांनी घेतला असून शेकडो दुचाकी चालकांना बोगस पावती देऊन महिन्याला लाखो रुपयांची आर्थिक वसुली केली जात आहे. पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पार्किंगवर नागरिकांची खुली लूट आणि लाखोंचा पार्किंग घोटाळा होत असतानाही पालिका अधिकारी मात्र ‘अनभिज्ञ’ आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेचे शहराच्या पूर्व, पश्चिम स्टेशन परिसरातील भागात पार्किंगसाठी मोक्याचे भूखंड आहेत. मात्र, पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पार्किंग कंत्राटाच्या नूतणीकरणात दरवर्षी अनियमितता असते. त्यामुळे एक वर्ष अधिकृतपणे सुरू असलेला पार्किंगचा ठेका रद्द झाल्यानंतरही त्याच ठेकेदाराकडून अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांकडून बेकायदा पार्किंग सुरू ठेवत वाहन चालकांची लूट आणि पालिकेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केले जाते. असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील पूर्वीचा पार्किंगचा भूखंड हा वाहतूककोंडी टाळण्यासाठी रिक्षा स्टॅण्डला देण्यात आला आहे. मात्र, नगरपालिका, वाहतूक विभाग आणि रिक्षा संघटनांमधील असमन्वय आणि दुर्लक्षित कारभारामुळे वाहनांचे पार्किंग बंद करूनही येथे पूर्ण क्षमतेने रिक्षा स्टॅण्ड सुरू करण्यात आले नसून हा भूखंड मोकळा पडून होता. रस्त्यांवर वाहने असुरक्षित असल्याने ८०० ते एक हजार वाहनांची क्षमता असलेल्या या भूखंडावर दुचाकी चालकांकडून पुन्हा वाहने पार्क करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, नगरपालिकेची कुठलीही अधिकृत परवानगी तसेच पालिकेच्या नावाची पावती न देता एका बोगस पावतीवर गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी प्रवाशांची लाखो रुपयांची आर्थिक लूट पार्किंग माफियांकडून केली जात आहे. या बेकायदा पार्किंगसाठी पैसे वसूल करणाऱ्यांकडे चालकांनी जाब विचारला असता त्यांना तेथील तरुणांकडून पावतीबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊन दमदाटी केली जात असल्याची तक्रार काही दुचाकीचालकांनी केली आहे. या माफियांवर कारवाई करत अधिकृत पार्किंग सुरू करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *