उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यात रविवारी हिमकडा कोसळून झालेल्या जलप्रलयातील मृतांचा आकडा बुधवारी ३२ वर पोहोचला आहे. या ठिकाणी चार दिवसांपासून ६०० जवान शोधकार्य आणि मदतकार्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. मात्र, अद्यापही जवळपास १७० जण बेपत्ता आहेत. एकीकडे मदतकार्य सुरु असतानाच दुसरीकडे या दुर्घटनेमध्ये बचावलेल्या आणि मरण पावलेल्यांसंदर्भात अंगावर काटा उभा करणारे घटनाक्रम समोर येत आहे. उत्तराखंडमधील पोलीस खात्यातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूसंदर्भातील अशीच एक माहिती आता समोर आलीय. मनोज चौधरी या ४२ वर्षीय मुख्य हवालदाराचा मृतदेह या दूर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सापडला. मनोज हे ज्या ठिकाणी तैनात होते तिथून हा मृतदेह तब्बल ११० किमी दूर म्हणजेच कर्णप्रयाग येथील अलकनंदा आणि पिंडार नदीच्या संगामजवळ आढळून आला.
मनोजच्या थोरल्या भावाने म्हणजेच अनिल चौधरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. “घडलेली घटना दुखद असली तरी माझ्या भावाचा मृतदेह आमच्या पूर्वजांचे विधी ज्या नदीच्या संगमावर होतात तिथेच सापडली. हा घाट आमच्या पूर्वजांचे गाव असणाऱ्या कनौडी गावाजवळ आहे. ऋषि गंगा नदी धौली गंगा नदीला ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी हा घाट असून पुढे ही संगम अलकनंदा नदीला जाऊन मिळतो,” असं मनोज यांच्या भावाने म्हटलं आहे.
