मुंबईजवळ नालासोपार्यात एका गर्भवती महिलेवर अतिप्रसंग करून तिला ठार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. तिच्या अडीच वर्षांच्या मुलाचंही अपहरण करण्यात आलं होतं. गटकीदेवी देवशी असं या मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी बारा तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला आणि मुलाचीही सुखरूप सुटका केली.
नालासोपारा पूर्व इथल्या हनुमाननगर परिसरात साई सहारा इमारतीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. हे देवशी कुटुंब 6 महिन्यांपूर्वी या इमारतीत राहायला आले होते. मृत महिलेचे पती अंबालाल देवशी ज्वेलरीच्या कामासाठी बाहेर असताना ही घटना घडली. या दाम्पत्याला अडीच वर्षांचा मुलगा आहे. या मुलाच्या सुटकेसाठी आरोपींनी दीड लाख रुपयांची खंडणीही अम्बालाल यांना मागितली.
ही घटना घडताच पोलिसांनी वेगाने तपासाची चाकं फिरवली आणि 12 तासांच्या आत आरोपींना अटक केली. खून करण्यापूर्वी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचं या आरोपींनी कबूल केलं आहे. पोलिसांनी अंबालाल यांच्या मुलाचीही सुखरूप सुटका केली आहे. पण, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
