पालघर जिल्ह्याातील विक्रमगड सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. या विभागाने रस्त्याचे बांधकाम न करताच दोन वेळा १५,६५,३८५ किमतीची देयके काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विक्रमगड तालुक्यातील सावराई ते कराचीपाडा या ६ किलोमीटर रस्त्याचे कोणतेही काम न करता ठेकेदाराला मात्र दोन वेळा देयक अदा करण्यात आले. यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते कैलासजी कुवरा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
सावराई ते कराचीपाडा या आदिवासी पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आले. मात्र या रस्त्याचे दोन वेळा देयक काढल्याची माहिती त्यांना मिळाली. दोन वर्षे उलटूनही सबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही.
रस्त्याचे बांधकाम न करताच देयके अदा केली जात असल्याने ठेकेदाराला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे काम सुरू केलेले नाही. शासकीय बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज करूनही अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. ग्रामस्थांना रस्त्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे.
