वाहतूक कोंडी हा सर्वांच्यापुढं उभा राहणारा एक महत्त्वाचा आणि प्रदीर्घ काळासाठी अनुत्तरितच राहिलेला प्रश्न. कितीही पर्याय आणि वाटा शोधल्या तरीही वाहतूक कोंडी कोणाला चुकलेली नाही. पण, यातूनही वाट शोधण्याची शक्कल अनेकजण लढवतात. अशीच शक्कल काही शिवसैनिकांनीही लढवली पण, आता मात्र हीच शक्कल त्यांना महागात पडण्याची चिन्हं आहेत. याप्रकरणी दोघांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी केली जात आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक कार चालक आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती भर रस्त्यात, वाहनांच्या गर्दीत रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहेत.
जलील यांनी व्हिडीओ ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ही दृश्य असून, त्यांनी रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांच्या कारवर असणारा लोगोच सर्वकाही सांगत असल्याची बाब इथं अधोरेखित केली. राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक या घटनेची दखल घेणार का, असा प्रश्न त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत उपस्थित केला आहे.
