जत तालुक्यातील आवंढी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मोठी जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे. अनेक जनावरांना चावा घेतला आहे. याबाबत पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कळवूनही वेळेत रेबिजची लस दिली नसल्याने या जनावरांचा मुत्यू झाला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पिसाळलेली काही कुत्री मारली गेलीत तर काही अजून मोकाट आहेत.
आवंढीत गेल्या आठवड्यात काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला होता. या कुत्र्यांनी गावातील एक बैल, पाच गायी, त्यांची चार लहान वासरे आणि म्हशींचा चावा घेतला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आवंढी पशूवैद्यकीय डॉक्टराना याबाबत माहिती दिली. मात्र, वेळेत उपचार झाले नाहीत. आणखी काही जनावरांना देखील पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांनाही रॅबिज झाल्याचा संशय आहे. त्यांना वेळेत लस, उपचार न मिळाल्यास तीही दगावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
