राज्यात ठाणे, सातारा, बीड, लातूर, नांदेड, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळे झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. या सातही जिल्ह्यांतील बाधित भागाच्या एक किलोमीटर परिसरातील २५ हजार २२९ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे.
भोपाळ येथील ‘राष्ट्रीय उच्चसुरक्षा पशुरोग संस्थे’च्या तपासणीत राज्यातील काही भागात दगावलेल्या कोंबड्यांचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले. त्यामध्ये मावंदा आणि रायता (ता. कल्याण, जि. ठाणे), मरीआईवाडी (ता. लोणंद, जि. सातारा), वरवटी (ता. अंबेजोगाई, जि. बीड), दावणगाव (ता. रेणापूर, जि. लातूर), चिखली, तलाहारी (जि. नांदेड), वारंगा (ता. हिंगणघाट, जि. नागपूर) आणि गडचिरोलीचा समावेश आहे. या भागांना ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागातील ‘बर्ड फ्लू’ रोगनियंत्रण कार्यवाहीची माहिती घेण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात दाखल झाले आहे. या पथकाने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदे, दौंड तालुक्यातील बोरीबेल, तसेच रायगडमधील पेण येथील ‘बर्ड फ्लू’ बाधित भागाची पाहणी केली, अशी माहिती विभागातर्फे देण्यात आली.

