वीजजोडणी कापल्याने १० हजारांवर जिल्हा परिषद शाळा अंधारात

वीजजोडणी कापल्याने १० हजारांवर जिल्हा परिषद शाळा अंधारात

लॉकडाउनच्या काळात वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे राज्यातील सुमारे १० हजार ६७१ जिल्हा परिषद शाळांची वीजजोडणी कापण्यात आली आहे. राज्य सरकारने मागविलेल्या माहितीमध्ये ही बाब समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल हे व्यावसायिक दराने आकारले जाते. हे बिल मुख्याध्यापक त्यांच्याकडे येणाऱ्या निधीतून भरत असतात. मात्र, सध्या हा निधी रोखला गेल्यामुळे अनेक शाळांना वीज बिलाचा भरणा करता आला नाही. याबाबत शासन दरबारी माहिती असतानाही वीज मंडळाने या शाळांची वीजजोडणी कापली आहे. सध्या शाळेत काही कामे करण्यासाठी शिक्षकांना जावे लागते. ही कामे अनेक शिक्षक ग्रामपंचायत कार्यालय अथवा अन्य ठिकाणी बसून करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल भरण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर असते. याचबरोबर अनेक शाळांचे मुख्याध्यात विविध निधीतून वीज बिल भरत असतात. मात्र, यंदा सर्व स्तरावरून येणारे निधी रोखण्यात आले होते. वेतनेतर अनुदानही बंद आहे. यामुळे शाळांना कोणताही खर्च करणे अवघड झाले आहे. अनेक गावांमध्ये लोकसहभागातून शाळा डिजिटल केल्या गेल्या आहेत. आता या शाळांमध्ये वीज नसल्यामुळे शिक्षक शाळेत आले, तरी ऑनलाइन वर्गासाठी त्यांना मोबाइलचाच वापर करावा लागत आहे. यामुळे सुविधा असूनही त्याचा फायदा घेता येत नाही. याबाबत राज्य सरकारने शाळांकडून माहिती मागविली होती. यानुसार राज्यातील १० हजार ६७१ शाळांची वीजजोडणी कापण्यात आल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *