मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या कार्यालयास आग

जलसंपदा  मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू कारखाना कार्यालयास रविवारी मध्यरात्री संशयास्पदरीत्या आग लागली. एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असताना  ही घटना घडल्याने ही आग लावली असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चार दिवसापूर्वी क्रांती कारखान्याचे कार्यालय पेटविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हयात हा दुसरा प्रकार आहे. मात्र, या प्रकारणी कोणीही तक्रार दाखल केली नाही तसेच या घटनेचीही कुणा संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली  नाही.

राजारामबापू साखर कारखान्याच्या मिरज तालुक्यातील सावळवाडी (कारंदवाडी गट नंबर ७) येथील कार्यालयास आग लावण्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. या आगीत कार्यालयात असलेल्या कागदपत्रे आणि फर्निचरचे नुकसान झाले असून ही घटना उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते.  स्वाभिमानीनेही या प्रकाराची  जबाबदारी अद्याप घेतलेली नाही. मात्र एकरकमी ‘एफआरपी’साठी संघटनेचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरूच राहील असेही सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *