५ जानेवारी रोजी पीडित तरुणी नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. तरुणी खासगी बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये चढल्यानंतर तिला बराच वेळ सीट मिळालं नाही. काही वेळानंतर तिला क्लिनरने बसच्या पाठीमागच्या सीटवर बसण्यास सांगितलं. बस सुरू झाल्यानंतर क्लिअनरने तिला चाकूचा धाक दाखवला आणि दोन वेळा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबद्दल वाच्यता केल्यास चालत्या बसमधून फेकून देण्याची धमकीही दिली.
तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी फरार आहे. ज्या बसमध्ये ही अत्याचाराची घटना घडली, ती बस मालेगाव पोलिसांनी पुण्यातून जप्त केली आहे. त्याचबरोबर आरोपी क्लिनरला अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक नागपूरला पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, पीडित तरुणीला वैद्यकीय चाचणीनंतर घरी पाठवण्यात आलं आहे.

