सीबीडी बेलापूर येथील स्व. राजीव गांधी क्रीडा संकुलामधील क्रिकेट मैदान आणि नेरुळ से. १९, येथील कै. यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील आंतराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विविध स्पर्धा, सराव सामने आदी कारणांसाठी ही मैदाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
स्व. राजीव गांधी क्रीडा संकुलातील क्रिकेटचे मैदान वर्षभर आरक्षित असते. या मैदानाला एवढी मागणी आहे की त्यासाठी एक ते दोन महिन्यांचे वेटिंगही असते. तसेच, फिफाच्या फुटबॉल सामन्यांच्या वेळी नेरुळमध्ये खास फुटबॉल मैदान तयार करण्यात आले होते. ते सध्या वापराविना आहे. त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पालिकेला करावा लागत आहे. करोनाकाळापासून ही मैदाने बंदच होती. मात्र शहरातील व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने विविध स्पर्धा, क्रिकेटचे सामने रंगू लागले आहेत. त्यामुळे ही दोन्ही मैदाने भाडेतत्त्वावर मिळण्यासाठी पालिकेकडे सातत्याने विचारणा करण्यात येत असते.

