विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची प्रक्रिया संपली असून, निकालही जाहीर झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम वगळल्यास इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या वर्षालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रथम वर्षासह प्रवेशित जुन्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे पाठ्यक्रमही पूर्ण झाला आहे. याचमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून फेब्रुवारीअखेरीस परीक्षा घेण्याची चाचपणी सुरू आहे. परीक्षा कमी कालावधीत होऊन, निकालाही वेळेत जाहीर होण्यासाठी सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. लेखी परीक्षा एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्नाधारित राहणार आहे. त्यामुळे निकाल कमी कालावधीत लावणे शक्य होणार आहे. शैक्षणिक वर्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासही मदत होणार आहे.
