सिगारेट आरोग्यास हानिकारक आहे’ खर तर असा फलक आपल्याला पान टपरी वरच बघायला मिळतो. मात्र याच पानटपरी बाहेर तरुणवर्ग धुराचे झुरके मारतांना सर्रासपणे नजरेस पडतात. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिण्यास तसेच तंबाखू आणि इतर नशा करण्यास बंदी असतांनाही कॉलेजेस बाहेर किंवा चहाच्या ठेल्यावर ठिकठिकाणी सिगारेटचा धुर सोडणारे, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारत टवाळक्या करणारे दिसून येतात
विशेष म्हणजे सिगारेटच व्यसन करण्यात अल्पवयीन मुलांचाही मोठा समावेश असल्याच दिसून येताच आरोग्य विभागाने एक प्रस्ताव सरकारकडे सादर केलाय. कायद्यानूसार सिगारेट पिण्यासाठी 18 वर्षाची वयोमर्यादा आता 21 वर्ष करण्यात येणार आहे. तसेच तंबाखूजन्य असे कुठलेही पदार्थ 21 वर्षाखालील कोणालाच आणि कुठल्याही मार्गे पोहोचणार नाही यासोबतच सुट्टी सिगारेट विक्रीवरही बंदी घालण्याची शिफारस केली गेली आहे. एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास होणारी कारवाई अधिक कठोर केली जाणार आहे. मुळात सिगारेट असो किंवा तंबाखू हे आरोग्यास हानिकारक आहेत. धक्कदायक म्हणजे जो व्यक्ती सिगारेटचे व्यसन करतो अशा व्यक्तीला कोरोना झाल्यास तो बरा होण्यासही वेळ लागत असल्याचं डॉकटर सांगतात.

