उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यात असलेल्या उघैतीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. ५० वर्षीय महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करायची. ३ जानेवारी रोजी महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, परत घरी आलीच नाही. महिलेच्या मुलाने दिलेल्या माहिती प्रमाणे, मंदिरातील पुजारी व इतर दोघांनी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणून ठेवला. त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच ते निघून गेले, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
याबाबत पोलिसांनी पुजाऱ्याची चौकशी केली. “पीडित महिला विहिरीत पडली होती. ती रडत होती. ती रडत रडतच मदतीसाठी बोलावत होती. इतर दोन व्यक्तींसह आपण विहिरीकडे गेलो. महिलेच्या नातेवाईकांचा आपल्याकडे मोबाईल नंबर नव्हता. त्यामुळे महिलेचा मृतदेह तिच्या घरी देऊन आलो,” असं पुजाऱ्यानं म्हटलं आहे.
पोलिसांनी पीडित महिलेचा मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं. शवविच्छेदन अहवालातून महिलेवर बलात्कार करण्यात आला असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याचबरोबर महिलेचा एक पाय मोडलेला असून, गुप्तांगातही गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत.
