पीपीई किट घालून येणारे डॉक्टरच असतील असा जर तुमचा समज असेल तर सावधान! वसई-विरारमध्ये चक्क एक मनोरुग्ण व्यक्तीच पीपीई किट घालून राजरोसपणे फिरत असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे.
विरार परिसरात पीपीई किट घालून एक मनोरुग्ण खुलेआम रस्त्यावर फिरताना समोर आला आहे. हा मनोरुग्ण काल दिवसभर विरार पूर्व परिसरात सर्वत्र मुक्त संचार करत होता. हा मनोरुग्ण फिरत असताना एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल केला आहे. हा मनोरुग्ण पीपीई किट घालून बिनधास्तपणे बाजारात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लोक तोंडाला मास्क लावत असून सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळत आहे. अशावेळी एक मनोरुग्ण चक्क पीपीई किट घालून फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आतापर्यंत पीपीई किट आणि एन-९५ मास्कसाठी हट्ट करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी चक्क मनोरुग्णच पीपीई किट घालून शहरात फिरत असल्याने वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे पीपीई किट या मनोरुग्णाकडे आले कुठून? हे कुठे वापरल्या गेले होते? हे पीपीई किट घालून हा मनोरुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आला? असे प्रश्न या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत.