जवळपास साडेतीन महिन्यांपासून बंद असलेले साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी साई संस्थानने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. राज्य शासनाची अनुमती येताच भाविकांच्या सुरक्षेचे सगळे नियम पाळून भक्तांसाठी दर्शन सुरू करता येईल, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. शिर्डीत रक्तदान शिबिराचा प्रारंभ झाल्यानंतर कार्यकारी अधिकारी डोंगरे बोलत होते.
सुरूवातीच्या काळात तासाभरात 300 ते 350 म्हणजे प्रत्येक मिनिटाला चार ते पाच भाविक दर्शन घेऊ शकतील. ठराविक वेळेनंतर दर्शनरांगा, रेलिंग सॅनेटाईज करावे लागणार आहेत. त्यामुळे दर्शनाचा कालावधी जवळपास 10 तासांचा असेल. तीन ते साडेतीन हजार भाविक दिवसभरात दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था संस्थानने केली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संस्थानकडून प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यात दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांचे शरीराचे तापमान मोजणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळणे या सारख्या आवश्यक त्या सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. तसेच पासधारक भाविकांना टाईम दर्शनाच्या माध्यमातून नियोजनबद्ध दर्शन देता येईल, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली आहे.
दरम्यान आज साई मंदिर बंद असल्याने संस्थानच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आल. गुरूपोर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने देशभरातील भाविकांना जवळच्या रक्तपेढीत रक्तदान करण्याच आवाहन करण्यात आलं. तर शिर्डीतही आज रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलं आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविकांनी रक्तदान करत आपली गुरुभक्ती रक्तदानातून प्रकट केली आहे.
रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्याचं आवाहनही साई संस्थानने केलं आहे. साईंच्या झोळीत यावेळी रक्ताचं दान केल्याने आम्हाला आनंद होत असल्याची भावना रक्तदात्यांनी बोलून दाखवली.