मान्सूनच्या आगमनानंतरही बराच काळ लांबलेला पाऊस आता सक्रिय झाला आहे. गुरुवारी रात्रीपासून बरसणाऱ्या रिमझिम पावसानं आज सकाळपासूनच चांगलाच जोर धरला. मुंबई व उपनगरांना पावसानं चांगलंच झोडपून काढलं. भारतीय हवामान विभागानं शनिवारीही मुंबई शहर व उपनगरातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच, सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी समुद्रात ४.४ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पावसानं राज्यात जोर धरला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मागील काही आठवड्यांपासूनच पाऊस सक्रिय झाला होता. मात्र असं असलं तरी मुंबईकरांना पावसाची फार काळ प्रतिक्षा करायला लागली. निसर्ग चक्रिवादळानंतर पावसाचं आगमन झाल्यानं मुंबईकरही सुखावले आहेत. मुंबईत कालपासून बरसणारा हा पाऊस शनिवारीही कायम राहणार असल्याचा आंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच, मुंबई महानगरपालिकेनंही २४ विभाग कार्यालयातील सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार शनिवारी मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतही रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, पुणे येथे घाट विभागांमध्येही रेड अॅलर्ट आहे. सध्या गुजरात आणि जवळच्या परिसरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.