चिपळूण तालुका मुस्लीम समाज संघटनेने कामथे उपजिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागासह इतर वॉर्डासाठी ३० खाटा देणगी म्हणून देण्यात आल्या आहेत. तसेच ३ वॉर्डांची रंगरंगोटी करून ६ लिटर क्षमतेच्या ३ नवीन गिझरसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या रूग्णालयात अनेक गैरसोयी असल्यामुळे तेथे करोनाग्रस्तांवर उपचार करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेढांबे, सावर्डे, वहाळ फाटा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आली.
तेथे आवश्यक यंत्रणा उपलब्ध करताना कामथे उपजिल्हा रूग्णालयावर अधिक ताण येत होता. त्यामुळे कामथे रूग्णालय जास्त सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सामाजिक संस्थांना आवाहन केले. त्यानुसार चिपळूण तालुका मुस्लीम समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रूग्णालयातील गैरसोयी दूर करण्याचा निर्णय घेतला. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संघटनेकडून मिळून गोळा झालेल्या दहा लाख रूपयांच्या देणगीमधून कामथे रूग्णालयाला ३० साध्या आणि अतिदक्षता विभागासाठी ७ खाटा देण्यात आल्या.
कामथे उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयींमुळे करोनाग्रस्तांवर उपचार करताना अनंत अडचणी येत होत्या. या सुविधांमुळे ते सुकर होणार आहे, अशी प्रतिक्रिया रूग्णालयाचे डॉ. संतोष हंकारे यांनी व्यक्त केली.