करोना संसर्गाचा उद्रेक कधीही होण्याची भीती असल्यामुळे घराबाहेर पडताना तोंडावर मुखपट्टया लावण्याचे बंधन न पाळणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिली आहे. सार्वजनिक स्थळी वावरताना तसेच खासगी कार्यालयात व खासगी वाहनातही मुखपट्टी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
घरातून बाहेर पडताना तोंडावर मुखपट्टय़ा लावूनच बाहेर पडा, असे आवाहन सरकारी यंत्रणांनी केले असले तरी, या नियमाचे काटेकोर पालन होत नाही. अनेक जण मुखपट्टय़ा वापरतच नाहीत तर, बोलताना मुखपट्टय़ा बाजूला करून बोलतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी, तसेच खासगी वाहनांमधून प्रवास करतानाही मुखपट्टी वापरणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने निर्गमित केले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला.
..असे आहेत निर्देश
कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यांसारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मुखपट्टी लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानाही मास्क लावणे आवश्यक आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध आहे.