बारामतीत मुलगी झाली म्हणून नवऱ्याची महिलेला रुग्णालयात शिवीगाळ करत मारहाण!

एकविसावे शतक उजाडून आता बराच कालावधी उलटून गेला आहे. तरीपण आपल्या देशातील बहुसंख्य जनतेची मानसिकता ‘मुलगी नको’ या घृणास्पद, बुरसटलेल्या मानसिकतेमध्ये अडकली आहे. खरंतर स्त्रीचा जन्म मिळणे, बाई म्हणून जन्माला येणे ही खरंच खूप अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे. पण, किमान आपल्या देशात तरी प्रत्येकीच्याच बाबतीत ही घटना तेवढी आनंददायी असेल असे नाही. कारण, अजूनही मुलगी नकोशी असल्याचा प्रत्यय आज देखील अनुभवयास मिळत आहे. अशीच एक घटना बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत घडली. मुलगी झाली म्हणून पतीने रुग्णालयात पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना घडली आहे.

डोर्लेवाडीतील अर्चना कृष्णा काळे या महिलेस मुलगी झाली म्हणून तिच्या नवऱ्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रातच मारहाण व शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला अटकाव करण्यासाठी आलेल्या आरोग्य केंद्रातील कर्मचारी बाळू चव्हाण गेले असता त्यांनाही महिलेचा पती कृष्णा काळे याने दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे. कर्मचारी बाळू चव्हाण यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर बारामतीच्या सिल्वर ज्युबली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कृष्णा काळे याच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. 353, 333, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *