राज्याचं शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरु झालं. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये काम सुरु करण्याची तयारी व ई लर्निंगबाबत मुख्याध्यापकांनी आठवड्यातून गरज पडल्यास दोन दिवस बोलवल्यास शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. यासंदर्भातील शिक्षण विभागाने नवे परिपत्रक जारी केले आहे. राज्यात कोरोना (कोविड-19) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण व शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याबाबत 15 जून 2020 शासन निर्णयान्वये घेतला आहे. यामध्ये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शाळा पूर्व तयारीच्या 15 दिवसांमध्ये कोणती कार्यवाही करावी, यामध्ये सष्ट केले आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थित राहण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतील. ही बाब विचारात घेता शिक्षकांसाठी वर्क फ्रॉम होमची सवलत दिली असली तरी शाळा सुरू करण्याची तयारी व ई लर्निंगबाबत मुख्याध्यापकांनी आठवड्यातून दोन दिवस बोलवल्यास उपस्थित राहावे, अस सांगण्यात आलं आहे.
ज्या शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती अत्यावश्यक असेल अशा शिक्षकांना शाळेमध्ये बोलवण्याबाबत मुख्याध्यापकांनी/शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. शिक्षकांना शक्यतो आठवड्यामध्ये एक किंवा दोन दिवसापेक्षा जास्त वेळा बोलवू नये. तसेच एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षकांनी विरोध करीत प्रवासाची सोय नसल्याने शाळेत उपस्थित राहणार कसे असे म्हटले आहे. ज्या शिक्षकांच्या सेवा कोविड आजारा संबंधित कामकाजासाठी दिल्या आहेत, त्या शिक्षकांना त्या कामातून कार्यमुक्त करण्याबाबत शिक्षणाधिकारी कार्यवाही करावी. त्यांच्याबरोबर समायोजित सरप्लस शिक्षकांनाही मूळ शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घ्यावा. शाळा क्वॉरंटाईनसाठी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. त्या शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येईपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलावू नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.
महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, रक्त दाब, हृदयविकार इत्यादी सारखे गंभीर आजार असलेले व 55 वर्षावरील पुरुष शिक्षकांना शाळेमध्ये न बोलवता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरु होण्याच्या कालावधीपर्यंत तात्पुरती वर्क फ्रॉम होमची सवलत असेल. मात्र, यावर आठवड्यातून एक दिवस शाळेत उपस्थित राहून इतर दिवशी घरूनच वर्क फ्रॉम करण्याचे आदेश शिक्षण उपसचिवांनी काढले असले तरी एक दिवस शाळेत कसे जावे व कशासाठी जावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत शिक्षकांना वर्क फ्रॉम होमच करू द्यावे, असं मत मुंबई भाजप शिक्षक सेल संयोजक अनिल बोरणारे यांनी मांडले आहे.