पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार

महाराष्ट्रात मुंबईनंतर करोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्याला बसला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांपुरता मर्यादित होता. इथं रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढत होती. ग्रामीण भागाला याची झळ बसली नव्हती. मात्र, इतर ठिकाणांहून जिल्ह्यात आलेल्या लोकांमुळं करोनाचा फैलाव ग्रामीण भागांतही झाला. आंबेगाव, जुन्नर, हवेली, मुळशी, खेड अशा सर्वच तालुक्यांत करोनानं शिरकाव केला. त्यानंतर तिथंही रुग्णांची संख्या वाढत गेली.

पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ९,९५९ होती. त्यानंतरच्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत बाधितांचा आकडा १०,०१२ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात करोनामुळं आतापर्यंत ४५० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही रुग्ण मुंबई, ठाणे, लातूर, भुसावळ व जळगाव येथील आहेत. बदललेल्या धोरणानुसार आरोग्य विभागानं या मृत्यूची नोंद त्या-त्या जिल्ह्यांच्या रेकॉर्डमध्ये केली आहे. त्यामुळं आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार पुणे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४४२ इतकी आहे.

पुणे शहर – ८३४८
पिंपरी चिंचवड – ८१६
पुणे ग्रामीण – ३५१
पुणे कॅन्टोन्मेंट जिल्हा रुग्णालय – ४९७
एकूण – १०,०१२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *