चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने वार करून, स्वतःच्या गळ्यावर आणि हातावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रांतवाडीतील शांतीनगर परिसरात रविवारी पहाटे ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
रोहित विजय मोरे (वय ३२, रा. शांतीनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो भारतीय सैन्यदलात नोकरीला आहे. मोहिनी मोरे (वय २९) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचा भाऊ सागर प्रकाश अल्हाट (वय ३३, रा. शांतीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित मोरे भारतीय सैन्य दलात ‘स्वयंपाकी’ म्हणून सेवेत आहे. एक महिन्याची रजा असल्याने मोरे शांतीनगरला घरी आला होता. घरी आल्यापासून पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून त्यांच्यात वाद होत होते. रविवारी रात्रीही झोपण्यापूर्वी त्यांच्यात भांडणे झाली. त्यामुळे चिडलेल्या रोहितने चाकूने पत्नीवर वार करून गंभीर जखमी केले. पत्नीला गंभीर अवस्थेत पाहिल्यावर त्याने स्वतःच्या गळ्यावर आणि हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रविवारी सायंकाळी रोहित मोरे याला अटक केली.
