औरंगाबाद: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कन्नड तालुक्यातील आडगाव (पिशोर) येथील उमद्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. गोरखनाथ नामदेव सुस्ते (वय ४० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव होते.

गोरखनाथ यांचा शेती बरोबर गायी खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. मागील दोन-तीन वर्षांपासून शेतीचे उत्पन्न घटल्याने ते कर्जबाजारी झाले होते. गेले काही दिवस ते प्रचंड तणावाखाली होते. त्यातूनच आज पहाटे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

सुस्ते यांनी पहाटे सहा वाजेच्या सुमारास गट क्रमांक ६६ मधील चिकूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नाचनवेल आरोग्यवर्धिनी केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत गोरखनाथ सुस्ते यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *