विदर्भात पावसाची शक्यता

राज्याच्या बहुतांश भागांत सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होत असल्याने तापमानात वाढ नोंदविली जात आहे. सध्या सर्वच ठिकाणी दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच मराठवाडा आणि विदर्भात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. दरम्यान, विदर्भात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मध्य प्रदेशापासून तमिळनाडूपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात अनेक ठिकाणी गेल्या आठवडय़ात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ४ मे रोजी संपूर्ण राज्यामध्ये कोरडे हवामान राहणार आहे. त्यामुळे या दिवशी उन्हाचा चटका वाढणार आहे. ५ मे रोजी विदर्भात काही ठिकाणी पावसाची हजेरी असणार आहे. इतर ठिकाणी मात्र हवामान कोरडे राहील. ६ आणि ७ मे रोजीही संपूर्ण राज्यात कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे.

 विदर्भ, मराठवाडा तापला

मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात सध्या किमान तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे असला, तरी मराठवाडा आणि विदर्भात सध्या तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदविली जात आहे. रविवारी (३ मे) अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ात परभणी, नांदेड येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमान आहे. विदर्भात नागपूर, वर्धा, ब्रम्हपुरी येथील कमाल तापमान ४४ अंशांपुढे असून, इतर ठिकाणी ते ४३ अंशांपेक्षा अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *