संचारबंदी असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून गाड्याही जप्त केल्या जात आहेत. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत सुमारे सहा हजारापेक्षा अधिक गाड्या जप्त केल्या आहेत. तर, शहर पोलिसांनी १०२५ जणांना अटक केली आहे.
लॉकडउन होऊन महिला झाला असून संचारबंदी असतानाही नागरिक अनावश्यक कारणांसाठी घरातून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. अनेकजण मोटारसायकलवरून किंवा गाडीमधून प्रवास करताना दिसत आहेत. पोलिसांचाही महत्त्वाच्या चौकात बंदोबस्त असून गाड्या थांबवून चालकाकडे चौकशी करत कारवाई केली जात आहे. परिमंडळ १मध्ये ६९८ गाड्या तर परिमंडळ २मध्ये २४२ गाड्या, परिमंडळ ३मध्ये ४०१, परिमंडळ ४मध्ये ८०१ आणि परिमंडळ ५मध्ये ११६७ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेनेही कारवाई करत १ हजार ७०८ गाड्या जप्त केल्या असून एकूण जप्त गाड्यांची संख्या ५ हजार १७ इतकी आहे. ३१ लाख ५८ हजार ८५० रुपयांचा दंडही वसूल केला आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून आजपर्यंत ठाणे ग्रामीण पोलिसांनी २ हजार ४०२ जणांविरुद्ध ५८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिरारोड उपविभागात २५७ गुन्हे तर भाईंदर १७७, गणेशपुरी ३८, मुरबाड ३७ आणि शहापूर विभागात २४ गुन्हे दाखल आहेत. ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक विभागाने मोटार वाहन कायद्याखाली १९ हजार ६३४ केसेस करत ७२ लाख ६८ हजारांची दंडवसुली केली आहे. तर, १ हजार १३८ वाहने जप्त केली आहेत.
