लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी आता केवळ ६ दिवस शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तसंच संपूर्म परिस्थितीचा आढावादेखील घेणार आहेत. यापूर्वी अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं २० आणि २५ एप्रिल रोजी काहीशा प्रमणात सशर्त सुट दिली होती. कोणत्या ठिकाणी दुकानं सुरू ठेवावी किंवा बंद याचा निर्णय राज्य सरकारांकडे सोपवण्यात आला होता.
यापूर्वी २० मार्च रोजी पंतप्रधानांनी पहिल्यांदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्याचं आवाहन केलं होतं. याव्यतिरिक्त त्या बैठकीत करोनाचा सामना करण्यासाठी राज्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, यावर चर्चाही केली होती.
११ एप्रिल रोजी दुसऱ्यांदा चर्चा
लॉकडाउनचा पहिला टप्पा १४ एप्रिल रोजी पूर्ण झाला. त्यापूर्वी ११ एप्रिल रोजी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. तसंच या बैठकीत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्या बैठकीत सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा कल लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याकडे होता. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला होता.
