सहा महिन्यांच्या बाळाची करोनावर मात

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील  एका सहा महिन्याच्या बाळाने करोनावर यशस्वी मात केली आहे. महत्वाची बाब म्हणजे, उपचारांच्या काळात बाळाला मिळालेले आईचे दूधही परिणामकारक ठरले आहे.

गेल्या १४ एप्रिल रोज रत्नागिरीजवळ साखरतर या गावातील बाळाला करोनाची लागण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी वेगळा वॉर्ड तयार करून तेथे या बाळाला आईसह ठेवण्यात आले. विशेष बाब म्हणजे, आईला करोनाची लागण झालेली नव्हती. त्यामुळे बाळाला स्तनपान करू दिले जात होते. सुरूवातीला काही दिवस बाळाला ताप येणे किंवा इतर त्रास जाणवला. पण, त्यानंतर त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली. या औषधोपचारादरम्यान आईच्या दूधाने बाळाला करोनाच्या लढाईत खरी ताकद दिली, असे मत जिल्हा रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ आणि बाळावर उपचार करणाऱ्या चमूचे प्रमुख डॉ. दिलीप मोरे यांनी व्यक्त केले आहे.

रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त

या बाळाचा दुसरा  तपासणी अहवालही  निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यत करोनाचा एकही करोनाबाधित रूग्ण नाही. तसेच इतर संशयित आणि कोरोनाबाधित रुग्णांचेदेखील अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *