भुयार खोदून ज्वेलर्समध्ये चोरी

लॉकडाउनच्या कालावधीत चोर देखील सक्रिय झाले आहेत. सगळीकडे सुनसान वातावरण असल्याचा फायदा घेत अंधेरी एमआयडीसी परिसरात चोरट्यांनी जमिनीखालून भुयार खोदून सुमारे दीड किलो चांदी पळवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील महेश्वरी नगरमध्ये महावीर ज्वेलर्स हे सोनेचांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून मालकाने दुकान बंद ठेवले होते. मंगळवारी रात्री चोरट्यांनी पाठीमागील बाजूने जमिनीखालून भुयार खणले आणि सुमारे दीड किलो चांदी पळवली. बुधवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर मालकाने दुकानाकडे धाव घेतली. दुकानाच्या मागे अर्धवट बांधकाम केलेली इमारत आहे. चोरांनी लॉकडाउनचा गैरफायदा घेत इमारतीच्या तळमजल्यातून भुयार खोदून दुकानात प्रवेश केला आणि चोरी करून पसार झाले. मालकाच्या तक्ररीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *