ॲमेझॉन’चे कामगार आजपासून संपावर

अमेझॉन या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीचे अमेरिकेतील शेकडो कामगार भारतीय वेळेनुसार आज, बुधवारपासून संपावर जाणार आहेत. साथरोगाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या पुरेशा सुरक्षेची उपाययोजना कंपनीकडून केली जात नसल्याच्या निषेधार्थ संपाचे हत्यार उपसण्यात आले असल्याचे कामगारांच्या संघटनेने म्हटले आहे.
जगभरातील ऑनलाइन रिटेल क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या अमेझॉनने करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. ‘करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असताना कंपनीच्या कामगारांसह सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यात अमेझॉनला आलेल्या अपयशामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी असून, कामगारांचे हे आजवरचे सर्वांत मोठे सामूहिक आंदोलन असेल,’ असे कामगार हक्क संघटनेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आज, बुधवारपासून सुरू होणाऱ्या संपामध्ये अमझॉनच्या गोदामांमध्ये काम करणारे तीनशेहून अधिक कामगार सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अमेझॉनचे कोडर्स आणि इंजिनीअर्स तीन दिवसांनी ऑनलाइन संप करणार आहेत.
कामाच्या ठिकाणी असलेल्या असुरक्षित परिस्थितीविषयी कामगार गेल्या काही आठवड्यांपासून इशारा देत आहेत. मात्र, कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, आवाज उठविणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केले जात आहे. अमेरिकेतील अॅमेझॉनच्या १३० गोदामांमधील ३० हून अधिक कामगारांची चाचणी करोना पॉझिटिव्ह आली आहे. अशा गंभीर परिस्थितीत कंपनीकडून अद्यापही सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याचे कामगार संघटनेने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *