करोनाबाधितांवर सिव्हिलमध्ये होणार उपचार

ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या विशेष रुग्णालयांमध्ये ठाणे सिव्हिल रुग्णालयाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांवर सिव्हिलमध्येच उपचार होणार असून या रुग्णालयातील अन्य रुग्णांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली. तसेच, ठाणे शहरासह इतरही शहरांत अलगीकरण केंद्रही तातडीने सुरू केली. मात्र, एखादा करोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्या रुग्णाला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात येत होते. ठाणे शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा १६पर्यंत गेला आहे. याशिवाय जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या महापालिका हद्दीमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढू लागला आहे. ही बाब सर्वांची चिंता वाढवणारी आहे. मात्र करोना रुग्णांवर उपचारासाठी सरकारने राज्यातील तीस सरकारी रुग्णालये विशेष रुग्णालये म्हणून नुकतीच घोषित केली आहेत. या रुग्णालयामध्ये सिव्हिल रुग्णालयाचा समावेश आहे.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले की, सिव्हिलमध्येच जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून व्हेंटिलेटर आणि इतरही सुविधा उपलब्ध असतील. तसेच, २०० ते २५० खाटा रुग्णालयात असतील. सध्या सिव्हिलमध्ये सहा करोनाबाधित आणि १५ संशयित रुग्ण दाखल आहेत. तर, येत्या एक किंवा दोन दिवसांत सिव्हिलमधील अन्य रुग्णांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्थलांतरित केले जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *