बावधनच्या बगाड यात्रेला गर्दी; आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल होणार

बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा ‘काशीनाथाचं चांगभलंच्या’ जयघोषात उत्साहात पार पडली. या यात्रेस हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. दरम्यान ‘करोना’ च्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर बंदी घालूनही तिचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

बावधन येथील भैरवनाथाची बगाड यात्रा रंगपंचमी दिवशी होत असते. या यात्रेतील बगाडाच्या आकर्षणामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक जमा होत असतात. परंतु यंदाच्या ‘करोना’ साथीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर यंदा बंदी घातली होती. तरीही आयोजकांनी यात्रेचे आणि त्यातील बगाड कार्यक्रमाचे आयोजन केले. ते पाहण्यासाठी परिसरातून हजारो भाविक आणि गावकरी जमा झाले होते. प्रशासन आणि पोलिसांनी गर्दी नियंत्रणात राहील यासाठी प्रयत्न केले मात्र यात्रा आयोजकांनी बगाड आणि त्याची सवाद्य मिरवणूक काढली. यामुळे यात्रेतील बघ्यांची गर्दी वाढत गेली. यात्रेवर बंदी असतानाही तिचे आयोजन करत गर्दी होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले आणि तहसीलदार रणजित भोसले यांनी अहवाल तयार करत तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.

आयोजकांना विनंतीनंतरही आयोजन

करोनाच्या अनुषंगाने यात्रा, जत्रांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आलेली आहे. बावधन यात्रेच्या आयोजकांनाही याबाबत आम्ही विनंती करत गर्दी होण्यास निमित्त ठरेल अशी कृती करण्यापासून परावृत्त करण्याची विनंती केली होती. तरीही त्यांनी यात्रेचे आयोजन करत गर्दी जमवल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *